आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केली अटक


रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून शिराळा (जि. सांगली) येथे म्हैस घेऊन जात असताना आंबा घाटातील दख्खन परिसरात दोन गाड्यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना खाली उतरवून मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले.

त्यानंतर साखरपा येथील गंद्रे पेट्रोलपंपाजवळ नेऊन फिर्यादीला अर्ध्या वाटेत सोडून आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी साखरपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच देवरुख पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पाच आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्यात फरहान रशीद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) व भूषण बिपेंद्र सावंत (२६, सर्व रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button