
लक्ष्मी ऑरगॅनिक’ आंदोलनात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा संघर्ष समितीचा आरोप
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले. मात्र उदय सामंत आणि योगेश कदम हे दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील मंत्री असूनही त्यांनी या आंदोलनाकडेे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे पंकज दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मोर्चा कंपनीपासून सुमारे ७०० मीटर अंतरावर पोलिसांनी रोखला. त्यानंतर आंदोलकांनी तेथेच सभा घेत विविध मागण्या मांडल्या. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले नाही. केवळ निवासी तहसीलदारांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारल्याने हा प्रकार आंदोलकांचा अपमान असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
www.konkantoday.com



