अपूर्ण विषयांना गती! समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूकबद्दल पंतप्रधानांचे प्रतिपादन!

नवी दिल्ली : समान नागरी कायदा (यूसीसी) आणि ‘एक देश, एक निवडणूक’ (देशभर एकत्र निवडणूक) या भाजपच्या विषयपत्रिकेवरील दोन प्रमुख बाबी अद्याप अपूर्ण राहिल्या आहेत. त्यावर देशात गंभीर्याने सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सांगत या दोन्ही कार्यक्रमांना केंद्र सरकारकडून गती दिली जात असल्याचे स्पष्ट संकेत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

भाजपच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून (व्हर्च्युअल) केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’मधून लोकसभा व राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव आहे. तर, ‘यूसीसी’मधून विवाह, दत्तक, वारसाहक्क यांसारख्या विषयांवर सर्व नागरिकांसाठी समान कायदे लागू करण्याचा उद्देश आहे.

आणीबाणीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगाल व केरळसारख्या राज्यांमध्ये राजकीय हिंसाचाराला संस्कृतीचे स्वरूप आले असून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत, पक्षाच्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या उंबरठ्यावर नवी ध्येये निश्चित करण्याचे आवाहन मोदींनी कार्यकर्त्यांना केले.

कामगिरीचा आढावा

मोदी यांनी गेल्या बारा वर्षांतील केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. राज्यघटनेचे अनुच्छेद ३७० रद्द करणे, तीन तलाकविरोधी कायदा, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम, तसेच, ब्रिटिशकालीन अनेक कालबाह्य कायदे रद्द करणे आणि नवीन संसद भवन उभारणे हे केंद्र सरकारचे मोठे योगदान असल्याचे मोदींनी नमूद केले.

भाजप हा असा पक्ष आहे, जिथे कार्यकर्त्यांसाठी पक्ष आईसारखा असतो. पक्षाचा स्थापना दिवस हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून भावनिक क्षण आहे. १९८०पासून पक्षाने भ्रष्टाचार, घुसखोरी आणि देशाच्या विकासासाठी सातत्याने काम केले असल्याचेही मोदींनी अधोरेखित केले. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुच्चेरीमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष नव्या उर्जेने कार्यरत झाला असून तिथे मोठे यश मिळेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button