कुंभमेळ्यासाठी हजारो वृक्षांचा बळी? मनपाच्या ‘लपवाछपवी’मुळे संशय वाढला!

नाशिक : कुंभमेळ्याच्या विविध कामांना सुरुवात झाल्यापासून शहरात आतापर्यंत किती झाडे तोडली गेली, याची खुद्द महापालिकेकडून लपवाछपवी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी १२७० झाडे तोडल्याची कबुली देण्यात आली होती. आता वृक्षप्रेमींनी तपोवन वगळता शहरात चार ते पाच हजार झाडे तोडण्यात येत असल्याचा दावा केला असताना दुसरीकडे मनपाचा उद्यान विभाग मात्र आजवर किती वृक्ष तोडले, याची आकडेवारी एकत्रित करावी लागेल, असे नेहमीच्या धाटणीत उत्तर देऊन वेळ निभावून नेत असल्याचे चित्र आहे. हिरव्यागार जुन्या वटवृक्षाच्या फांद्या छाटताना ते सुकल्याने धोकादायक ठरल्याचे कारण पुढे केले आहे.

गंगापूर रस्त्यावरील जुन्या वटवृक्षाच्या फांद्या छाटण्यावरून सोमवारी नवश्या गणपती चौकालगत गदारोळ उडाला. वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी वाहनात डांबून पोलीस ठाण्यात नेले. महापालिकेने बंदोबस्तात वटवृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम केले.

कुंभमेळ्यासाठी ३० ते ३५ हजार कोटींची कामे नाशिक शहरासह ग्रामीण भागात होत आहेत. यातील बरीचशी कामे नाशिक शहरात म्हणजे महापालिका हद्दीतील आहेत. यामध्ये रस्ते, पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र. घाट बांधणी अशी बरीच मोठी यादी आहे. याकरिता वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याकडे पर्यावरणप्रेमींकडून लक्ष वेधले जाते.

साधारणत: पाच महिन्यांपूर्वी तपोवनातील १८०० वृक्ष तोडण्याचा विषय ऐरणीवर आला होता. पर्यावरणप्रेमींचा विरोध आणि राष्ट्रीय हरित लवादाची तात्पुरती स्थगिती यामुळे तेथील झाडे अजून तग धरून असल्याची वृक्षप्रेमींची भावना आहे.

तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर हरकती आणि आक्षेपांना उत्तर दिले गेले नाही. तपोवनच्या विषयावरून गदारोळ झाला, त्या काळात पालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी तोडलेल्या झाडांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या भागात वृक्ष तोडण्यासंबंधी नोटीस लागतात, सुनावणी पार पडते. आणि वृक्ष तोडली जात असली तरी एकत्रित आकडेवारी देण्यात आलेली नाही.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी १७२८ झाडे तोडण्याची मागणी होती. यातील ४५८ वृक्ष वाचवली गेली. उर्वरित १२७० झाडे तोडण्यात आली. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नव्याने लावलेल्या १७ हजार ६८० वृक्षांची लागवड केली असल्याच्या मनपाच्या दाव्याची पोलखोल पर्यावरणप्रेमींनी फाशीच्या डोंगरावर भेट देऊन केली होती. मनपाच्या उद्यान विभागाकडे आतापर्यंत तोडलेल्या झाडांची एकूण आकडेवारी मागितल्यास असमर्थता व्यक्त केली जाते. यामुळे वृक्षतोडीविषयी पर्यावरणप्रेमी संशय घेत आहेत.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी आतापर्यंत किती झाडे तोडली गेली, याची संपूर्ण आकडेवारी लगेच सांगता येणार नाही. ती एकत्रित करावी लागेल. सध्या गंगापूर रस्त्यावर ४०० हून अधिक झाडे असून त्यातील ४४ झाडे तोडली जाणार आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मनपा आयुक्तांनी त्यास मान्यता दिली आहे. गंगापूर रस्त्यावर सहा मीटर आत असणारे झाड वाळलेले आहे. काही फांद्या पडत असल्याने ते धोकादायक झाले. या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. – विवेक भदाणे (प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button