प्रशासक काळातील त्या ठरावांना पुन्हा स्थगिती

मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूर

रत्नागिरी ः
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासक काळात पूर्ण झालेल्या वादातीत 3 कामांबाबत सुस्पष्ट अहवाल देऊन तो सभेसमोर आणावा. त्याचबरोबर विकासकामे वाढीव मुदत देऊन पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव सोमवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसमोर प्रशासक काळात पूर्ण झालेल्या तीन कामांना मंजुरी देण्याचा विषय होता. चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर आलेल्या नवीन पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही कामे मंजुर करण्याचा विषय होता. या पहिल्या सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता.
विकासकामे पूर्ण झाल्यानंतर काम करण्यासाठी मंजुरी देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करणे अडचणीचा असल्याचे समजल्यानंतर दुसऱ्या सभेवेळी मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देताना या तीन कामांच्या ठरावाला स्थगिती देऊन इतिवृत्त मंजूर करण्यात आले होते. आठवडा बाजार येथील शौचालय सुशोभिकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे आणि व्यायामशाळेचे काम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी दिल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची भिती होती. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी त्या दिशेने कागदपत्रांची जमवाजमव करून तयारी पूर्ण केली होती.

शिवसेनेचे सदस्य प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी या प्रकरणी भूमिका मांडताना सांगितले की, ही कामे प्रशासक काळात झाली आहेत. त्यामुळे यामध्ये नगरसेवकांची कोणतीची भूमिका नाही. यानुसार प्रशासनाने स्पष्ट अहवाल बनवून नगराध्यक्षांकडे द्यावा. त्यानंतर पुढील सभेमध्ये मंजुरी द्यायची की नाही, याचा निर्णय घेऊ, असे सांगितले. सर्व नगरसेवकांनी या भूमिकेला पाठिंबा दिला. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनीही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हा ठरावा सर्वानुमते मंजूर झाला असून पुन्हा एकदा हा विषय स्थगित झाला आहे.
सर्वसाधारण सभेसमोरील विविध कामांना मुदतवाढ देण्याच्या विषयावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. मुदतवाढ देऊनही जे ठेकेदार कामे पूर्ण करून देत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूर झाला आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजन शेट्ये, सौरभ मलुष्टे, सभापती विजय खेडेकर, भाजपचे समीर तिवरेकर, राजू तोडणकर, सभापती निमेश नायर, अमित विलनकर, केतन शेट्ये, नगरसेविका सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, वैभवी खेडेकर आदींनी सभेसमोरील विषयांवर बाजू मांडल्या.
बाजारपेठेतील मच्छीमार्केटच्या इमारतीसमोर रिक्षा स्टॉप असल्याने गाळे घेण्यासाठी कोणीही व्यापारी पुढे येत नाहीत. त्यामुळे येथील रिक्षास्टॉप बाजुलाच असलेल्या तलावासमोर स्थलांतरीत करण्याचा ठराव सभापती विजय खेडेकर यांनी मांडला होता. हा ठरावही सर्वानुमते मंजूर झाला आहे. रिक्षास्टॉप स्थलांतरीत करण्याच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे घोड्यांचा तबेला असून तो हटवण्याची कार्यवाही करण्यालाही मंजुरी देण्यात आली. लाखो रुपयांचे खर्चुन रत्नागिरी नगरपरिषद इमारत बांधत आहेत. परंतू येथील गाळे गेले नाहीत तर तो खर्चही फुकट जातो आणि उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची सुचना सभापती निमेश नायर आणि विजय खेडेकर यांनी केली.
मंजूर शहर सुधारित विकास योजनेंतर्गत नियोजित रस्ता रद्द होण्याचा ठरावही मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची मागणी सर्वानुमते मंजूर झाली. याचवेळी मांडवी येथील प्रवेशद्वाराजवळ असलेली पाण्याची टाकी वापरात नसल्याने ती काढून घेण्याची सुचना सभापती निमेश नायर यांनी केली, ती मागणीही मान्य करण्यात आली. परटवणे येथील पुलाला जोडरस्ता करून घेण्यासाठी तेथील खासगी जागा मालक यांची संमत्ती लवकरात लवकर मिळवून घ्यावी, अशी मागणी नगरसेविका वैभवी खेडेकर आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी केली. ही मागणीही सर्वानुमते मंजूर झाली आहे.
मुदतीत विकास कामे न करणाऱ्या ठेकेदारांना दंडाची नोटीस दिली जावी. तरीही उगाचच काम लांबवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरसेवक बंड्या साळवी आणि राजन शेट्ये यांनी लावून धरली. सभागृहाने ही मागणी सर्वानुमते मंजुर केली आहे. सभेच्या सुरवातील नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी रत्नागिरी शहर कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व सहकारी नगरसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button