
रत्नागिरी- दादर पॅसेंजरची सेवा पूर्ववत करावी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे झाल्यापासून सुरू असणारी रत्नागिरी- दादर पॅसेंजर गाडी कोकणकरांची हक्काची रेल्वे सेवा आपण बंद केली आहे, ती पुन्हा दादरपासून सुरू करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
असंख्य कोकणकर हे मुंबईसह उपनगरात विशेषत: विरार, वसई, भोईसर, मीरा-भाईंदर, ठाणे, भांडुप अशा ठिकाणी राहतात.
त्यामुळे दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी या अत्यंत सोयीची पडत होती. या गाडीच्या माध्यमातून कोकण रेल्वेने चांगली सुविधा कोकणवासियांना विशेषत: मध्यमवर्गीयांना उपलब्ध करून दिली होती.
कोरोना कालावधीत ही गाडी दादरपर्यंत बंद करण्यात आली. त्यानंतर आजतागायत अनेकदा मागणी करूनही ही गाडी सुरू न झाल्यामुळे सर्व कोकणकरांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच आर्थिक नुकसान होत आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून कोकणकरांच्या जीवनाशी निगडीत असणारी रत्नागिरी- दादर पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादर स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी मागणी करत असून, ही सेवा सुरू न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, महिला आघाडीच्या सौ. शिवानी सावंत-माने, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, राजाराम रहाटे, प्रशांत सुर्वे, साजिद पावसकर उपस्थित होते.




