
रत्नागिरी पोलिसांची ‘डिजिटल’ भरारी
प्रशासनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांमुळे रत्नागिरी पोलीस दलाने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यातील ३४ सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने पाचवा क्रमांक पटकावून प्रशासकीय उत्कृष्टतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

तंत्रज्ञानाची जोड आणि मानवी चेहरा
केवळ गुन्हेगारी नियंत्रणच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या जीवनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी नितीन बगाटे यांनी २४ हून अधिक लोकाभिमुख उपक्रम सुरू केले आहेत. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि व्हॉट्सअॕप चॅटबॉट यांसारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
सुरक्षेची नवी कवचकुंडल: प्रमुख उपक्रम
मिशन जीवन: जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक एकाकी ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करून, त्यांच्या वाढदिवशी प्रत्यक्ष घरी जाऊन शुभेच्छा देण्याचा हा उपक्रम पोलिसांचा ‘संवेदनशील चेहरा’ समोर आणतो.
रेड्स ॲप: गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी AI चा वापर करणारे हे ॲप अत्यंत प्रभावी ठरत आहे. याद्वारे बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि अनोळखी मृतदेहांची ओळख पटवणे सुलभ झाले आहे.
रत्नसेतू चॅटबॉट: एका क्लिकवर पोलीस सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी ‘डिजिटल हेल्प डेस्क’ ठरला आहे.
बंदोबस्त ॲप: पोलीस कर्मचाऱ्यांचे लाईव्ह ट्रॅकिंग आणि बंदोबस्ताचे अचूक नियोजन यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक शिस्तबद्ध झाली आहे.
मिशन संवेदना: महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा अवघ्या ४८ तासांत तपास पूर्ण करण्यावर या मिशनचा भर आहे.
तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती
तक्रारदारांना आपल्या केसचे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. ‘मिशन प्रगती’ अंतर्गत फिर्यादींना तपासाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. तसेच ‘मिशन गती’ मुळे प्रलंबित गुन्ह्यांच्या निकालाचा वेग प्रचंड वाढला आहे.
“पोलीस दल हे केवळ धाक दाखवणारे यंत्र नसून ते नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले मित्र आहे, हे या उपक्रमांतून सिद्ध झाले आहे.”
डिजिटल गाववारी, मिशन फिनिक्स (अंमली पदार्थ विरोधी मोहीम) आणि मिशन सायबर जागृती यांसारख्या उपक्रमांनी रत्नागिरी जिल्ह्याला सुरक्षिततेचे एक नवे वलय प्राप्त करून दिले आहे. ई-गर्व्हनन्सच्या माध्यमातून पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम कसे होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखालील रत्नागिरी पोलीस दल होय.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




