
पर्यावरणपूरक आणि रोजगारक्षम प्रकल्प उभारण्याची मागणी…. आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदन
राजापूर : तालुक्यातील विलये, तारळ, नाणार, गोठीवरे, सागवे ते जैतापूर परिसरातील स्थानिक रहिवासी, शेतकरी व बागायतदार यांनी पर्यावरणपूरक आणि रोजगारक्षम प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यात औद्योगिक विकासाचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना व मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागत आहे. परिणामी, गावांमधील घरे ओस पडत असून शाळांमधील पटसंख्या घटत आहे. याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम होत असल्याचे आ. सामंत यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, हवामानातील बदलांमुळे आंबा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीत पर्यायी रोजगाराची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
सदर परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीही विविध प्रकल्पांसाठी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त ‘ऑटोमोबाईल हब’सारखा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराची हमी मिळावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
स्थानिकांनी आमदारांनी ही मागणी शासन दरबारी मांडून पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. तसेच, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या या मागणीमुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



