कोकण किनारपट्टीवर ‘मुसळधार’ पाऊस; आज कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र् आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर!


मुंबई : राज्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद होत असून गुरुवारीही कोकण किनारपट्टीसह विदर्भातील काही भागात पावसाचा जोर दिसून आला.

दरम्यान, ७ जुलै पर्यंत राज्यातील काही भागांत पावसाची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही भागात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला बळ देणाऱ्या काही हवामान प्रणाली सक्रिय झाल्या असून त्यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ३ जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार एक दिवस आधीच गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्याच्या जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दरम्यान, गुरुवारी मोसमी पावसाने राजधानी दिल्लीपर्यंत वाटचाल केली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून पुढील दोन ते तीन दिवसात देशातील उर्वरित भागात मोसमी पावसाची वाटचाल होण्यास अनुकूल स्थिती आहे, असेही हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे तर काही भागात अजूनही समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. दरम्यान, गुरुवारी कोकण प्रदेश, विदर्भ आदी भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. त्यात मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर होता, तर सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, नंदुरबार आणि लातूर येथे पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे दिसून आले.

दरम्यान, शुक्रवारी कोकण प्रदेश आणि मध्य महारष्ट्रातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला तर विदर्भातील काही जिल्हे वगळता इतर भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरीही बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज अजून काही भागात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता वर्तवली आहे.
रायगड आणि पुणे घाट विभाग आदी भागांना शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, ठाणे, मुंबई, पालघर, बुलढाणा, अकोला, अमरावती आदी भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button