
“नरेंद्र मोदी कदाचित या वर्षाच्या शेवटपर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत”, अरविंद केजरीवालांचा मोठा दावा!
Arvind Kejriwal claims PM Modi and Amit Shah will leave office by 2026 : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (ता. २३ ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. केजरीवाल म्हणाले की, नरेंद्र मोदी कदाचित या वर्षाच्या शेवटपर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत. २०२६ अखेरीसपर्यंत ते पदावर नसतील. माझे मन आणि राजकीय समज मला सांगतात की मोदी आणि अमित शाह पद सोडणार आहेत. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, “मोदींची लोकप्रियता तळाला पोहोचली आहे. त्यांचे राजकीय वर्चस्व कोसळण्याच्या मार्गावर आहे.”
केजरीवाल यांनी हे वक्तव्य दिल्लीत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केले. या कार्यक्रमाला दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल आणि संजय सिंह यांसह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.
“परिस्थिती बदलली आहे”
सोशल मीडियाविषयी बोलताना ते म्हणाले, “आता मोदींना सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये केवळ टीकाच मिळते. एक काळ असा होता की त्यांच्या पोस्टवरील नकारात्मक प्रतिक्रिया संपूर्ण यंत्रणेद्वारे हटवल्या किंवा म्यूट केल्या जात. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ते कोणतीही पोस्ट करताच कमेंट बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया दिसतात.”
मोदींची लोकप्रियता घटली!
ते पुढे म्हणाले, “पूर्वी मोदींच्या विरोधात मीम्स बनवणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असे. पण आता इतक्या मोठ्या प्रमाणात मीम्स तयार होत आहेत की, कोणाला अटक करणार, हेच समजत नाही. यावरूनच सोशल मीडियाचे वातावरण पूर्णपणे बदलले असल्याचे दिसते आणि मोदींची लोकप्रियता घटल्याचे स्पष्ट होते.”
अप्रामाणिकपणे निवडणुका जिंकत असल्याचा आरोप
भाजपच्या निवडणूक विजयावर टीका करताना केजरीवाल म्हणाले, “ते अप्रामाणिक पद्धतीने निवडणुका जिंकत आहेत. मी त्याचे जिवंत उदाहरण आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना मला पूर्वी १४८००० मते मिळाली होती. मात्र तुरुंगातून परत आल्यानंतर ती संख्या १०६००० वर आली. म्हणजेच सुमारे ४२००० मते कमी झाली.”
ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारे ते मतांची फेरफार करतात. ते निवडणुकीतील मते कधी वाढवतात, कधी कमी करतात आणि बनावट मतं टाकतात. जेव्हा देश या दोघांपासून (मोदी आणि अमित शाह) मुक्त होईल, तेव्हा या लढ्यात आम्हीही योगदान दिले आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला, याचे समाधान मिळेल.”
मध्यपूर्वेतील संकटावर केंद्र सरकारवर सवाल
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की, शेअर बाजार कोसळला आहे, एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे आणि लोक उकाड्यात सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत. स्थलांतरित मजुरांच्या नोकऱ्या जात आहेत आणि रुपयाही नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
“जगाला आधीच या परिस्थितीची कल्पना होती, मग सरकारने पूर्वतयारी का केली नाही? प्रत्येक संकटाचा भार सामान्य नागरिकांवरच का टाकला जातो?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.




