
तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार राज्यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राज्यात विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना खुर्ची गमवावी लागताना दिसत आहे.राज्यात सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बंपर जागा मिळताना दिसत आहे. विजय यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तरीही जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. सुरुवातीच्या कलात विजय यांच्या पक्षाला 102 जागा मिळताना दिसत आहे. ही फार मोठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जात आहे. एक्झिट पोलमध्ये विजय यांना झटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण मतदारांनी एक्झिट पोलचा अंदाजच उडवून लावला आहे. सुरुवातीच्या कलात टीव्हीके सत्तेत जाताना दिसत असल्याने डीएमकेच्या कार्यालयाबाहेरचा तंबू काढण्यात आला आहे.
सुरुवातीच्या कलानुसार राज्यात टीव्हीके हा सर्वा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. टीव्हीकेला सुरुवातीच्या कलात 102 जागा मिळताना दिसत आहेत. तर एआयडीएमकेला 54 आणि सत्ताधारी डीएमकेला 70 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे सत्ताधारी डीएमके अजूनही 32 जागांनी पिछाडीवर आहे. हा स्टॅलिन यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.




