
मिशन लक्षवेध विभागीय स्तरावरील क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणी
रत्नागिरी, दि, 20 ) :- राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसीत होण्याच्या दृष्टीने मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
पुणे विभागाचे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र हे निवासी केंद्र असून या केंद्राकरिता सद्यस्थितीत अॅथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस, हॉकी या सहा खेळांकरिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. पुणे विभागाचे विभागस्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन २३ व २४ मार्च या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वेटलिफ्टिींग हॉल शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे अॅथलेटिक्स, शुटींग, कुस्ती, टेबल टेनिस, हॉकी या खेळांकरीता तर रोईंग या खेळाकरीता आर्मी रोईंग नोड, सी. एम. ई. पुणे या ठिकाणी खेळाडूंनी उपस्थित राहायचे आहे. खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, क्रीडा कामगिरी (शुटींग, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, कुस्ती, हॉकी या खेळाचे राज्य/राष्ट्रीय स्तरावरील रँकींग) मूळ कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे.
विभागस्तर क्रीडा निपुणता केंद्राच्या प्रवेशाकरिता चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित केला असून दिनांक २३ मार्च रोजी वर नमूद ठिकाणी आवश्यक साहित्यासह उपस्थित रहावे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंना निवड चाचणीकरिता वर नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वैशाली दरवडे, मो. क्र. ९८९०२२५११७, संकेत मचाले, मो.क्र. ७०३८२२५०१४ व आकाश सलगर, मो. क्र. ९२८४८०६००३ यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वरील संबंधित खेळातील अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त इच्छुक खेळाडूंनी सदर निवड चाचणीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.



