
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो- खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा पंधरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तेजस्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मागील काही वर्षे खो-खो आणि वांझोळे सनगलेवाडी हे एक समीकरण तयार झाले आहे आणि यामधूनच वांझोळे हे खो-खोचं गाव म्हणून नावारूपाला आलं. याठिकाणी अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू तयार झाले अनं देशभरात वांझोळे गावाचं नावं पोचलं. तेजस्विनी ही या सर्व खेळाडूंमधील एक आघाडीची खेळाडू होती. वयाच्या १२ व्या वर्षीच भुवनेश्वर ओडिसा येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड होऊन राष्ट्रीय स्पर्धेत अतिशय महत्त्वाची कामगिरी करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने अतिशय महत्वाची भूमिका बजावली आणि जि. प. शाळेची सर्वांत लहान वयामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक सुद्धा मिळवला होता.
अनेक स्पर्धांमध्ये तिने आपल्या खेळाने कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिले होते. उंचीने लहान परंतु आपल्या खेळाने महान म्हणून तिने तिच्या खेळाची छाप कायमच सर्वांवरती सोडली होती. अतिशय चपळ आणि विजेच्या वेगाने मैदानावर असणारी तेजस्विनी आज त्याच वेगाने सर्वांमधून निघून गेलेय हेच मुळी सर्वाना दुःखाचा चटका देऊन गेला आहे. खो-खोच्या मैदानावर अनेक सामने स्वतःच्या अंगावर घेऊन जिद्दीने लढून जिंकणारी तेजस्विनी आयुष्याचा सामना मात्र हरली ही गोष्ट आज सर्वांसाठी वेदना देणारी ठरत आहे. तिच्या अकाली जाण्याने सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.




