सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना आगवे (ता. चिपळूण) येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एक सिंगल बॅरल कडतुसची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक, ९ जिवंत काडतुसे, असा एकूण ७० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १८ मार्च रोजी करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यांना प्रतिबंध घालण्यासाठी व कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक १८ मार्च रोजी सावर्डे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आगवे येथे महेश जाधव हा आपल्या घराच्या मागील बाजूस अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या पथकाने या ठिकाणी सापळा रचून पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्या जवळील लाकडी खोपटीत एकजण बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली. पाहिणी दरम्यान त्याच्याकडे असलेली बंदूक ही लिगल बॅरल काडतुसाची बंदूक असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. या पथकामार्फत पुढील तपासणी दरम्यान त्या ठिकाणी एक सिंगल बॅरल कडतुसची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक, ९ जिवंत काडतुसे, असा एकूण ७० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महेश महेंद्र जाधव याच्याविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२६ शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास सावर्डे पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे व यांच्यासह पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button