अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन


मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले.
मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गण आणि कोकणातील आमदार व सचिव स्तरावरील आणि जिल्हास्तरावरील अधिकारी यांची संयुक्तरीत्या आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,कृषी मंत्री दत्ता भरणे,खासदार नारायण राणे,खासदार सुनील तटकरे,मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम,आमदार निलेश राणे,दीपक केसरकर,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,ज्ञानेश्वर म्हात्रे,भास्कर जाधव,महेंद्र दळवी,किरण सामंत कोकणातील सर्व आमदार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.
आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने ऐकून घेतली.
“कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल,” असा ठोस विश्वास त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासन प्रत्यक्षात यशस्वी होणार आहे.कोकणातील शेतकऱ्यांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button