
गुहागर येथे गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतुसांसह एकाला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर येथे एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक काल (१४ मार्च) गुहागर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
गुहागर ते शृंगारतळी जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) याला पोलिसांनी अडवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे मिळून आली. यामध्ये पोलिसांनी त्याच्याकडून एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्ट, आठ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी संजय फनगुसकर याच्याविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३ (२५) अन्वये गुन्हा (रजिस्टर नंबर १९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत आणि चालक अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.




