
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचा गुढीपाडवा स्नेहमेळावा २२ मार्चला
रत्नागिरी : वसंतोत्सव आणि हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात साजरे करण्याच्या उद्देशाने कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने गुढीपाडवा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता नाचणे येथील ‘श्रीमान यशवंत हरी गोखले भवन’ येथे होणार आहे. या वेळी विशेषतः महिलांसाठी चैत्रागौर हळदीकुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला असून या पारंपरिक सणाचा आनंद सर्वांनी एकत्रितपणे साजरा करण्याचा उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि शांतिपाठाने होणार आहे. त्यानंतर प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात येईल. या स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यामध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्ती, वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेली दांपत्ये, शालाबाह्य स्पर्धा परीक्षा किंवा विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय समाजबंध दृढ करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या विशेष उल्लेखनीय कार्याचाही सन्मान केला जाणार आहे.
या वेळी संगीतमय मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात अभंग व नाट्यगीत गायन सादर केले जाणार आहे. या संगीत कार्यक्रमात गायिका सौ. करुणा पटवर्धन आणि सौ. देवश्री शहाणे, हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ प्रथमेश शहाणे, तर तालवाद्याची साथ राघव पटवर्धन देणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला सभेचे सदस्य, कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.




