कोकण रेल्वेच्या प्रवासी कोट्यात मे महिन्यापासून मोठी वाढ; रत्नागिरीकरांना दिलासा

नवी मुंबई : कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची २३ वी बैठक नुकतीच नवी मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, प्रलंबित असलेला प्रवाशांचा कोटा वाढवण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त लाभला आहे. मे २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार, मडगावचा कोटा आता रत्नागिरी स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी ‘पीआरएस’ (PRS) टर्मिनलवर तसे बदल करण्यात आले आहेत. कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेसमध्ये २एसी, ३एसी आणि ३ई क्लासमध्ये ५० टक्के, तर स्लीपर क्लासमध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस चेअर कार आणि सेकंड सिटिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर वंदे भारत एक्सप्रेसच्या चेअर कारच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फायदा रत्नागिरीसह संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येथील प्रवाशांना होणार आहे.

दरम्यान, गाड्यांच्या वाढत्या विलंबाबाबत वहाळकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेषतः तेजस एक्सप्रेस सारख्या प्रीमियम गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगितले. यावर मार्गावरील मेंटेनन्सची कामे आणि मध्य रेल्वेवरील ब्लॉक्समुळे हा विलंब होत आहे; मात्र येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होतील आणि गाड्यांचे परिचालन पूर्ववत होईल आणि तेजस एक्सप्रेस वेळेवर धावण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रत्नागिरी-दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे; मात्र, तोपर्यंत ही गाडी दिव्यावरून लवकर सोडण्याची मागणी वहाळकर यांनी केली. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेसोबत बैठक घेऊन गाडी लवकर सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
रत्नागिरी स्टेशनवरील दुचाकी पार्किंगवर शेड उभारणे, पट्टे आखणे आणि बोर्ड लावण्याचे निर्देश सीएमडी संतोषकुमार झा यांनी तातडीने दिले आहेत. वांद्रे टर्मिनस – मडगाव ट्रेनला खेड येथे थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग भारतीय रेल्वे करणार असली, तरी त्याचे काम कोकण रेल्वेला मिळावे यासाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा, वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, मुख्य अभियंता प्रकाश, आमदार संजय केळकर (महाराष्ट्र विधानसभा प्रतिनिधी), खासदार अनुप धोत्रे (पार्लमेंट प्रतिनिधी) आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button