
महाराष्ट्र व्हॅट व व्यवसाय कर च्या संकेतस्थळावरील अडचणींबाबत कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा चे निवेदन
रत्नागिरी दि. १२-३-२०२६ : महाराष्ट्र राज्य सरकारने व्हॅट व व्यवसाय कर साठी ऑक्टोबर २०२५ पासून नवीन संकेतस्थळ चालू केले आहे . सदर संकेत स्थळावरून नवीन नोंदणी साठी अर्ज करणे, नवीन प्रोफाइल तयार करणे त्यासाठी येणारे ओटीपी वेळेत न येणे, संकेतस्थळ बऱ्याच वेळा उपलब्ध नसणे, विवरण पत्रके दाखल करण्यासाठी यूटिलिटि दिलेली नसणे, जुन्या संकेतस्थळावरील माहिती (विवरणपत्रके, कर भरल्याची चलने ) उपलब्ध नसणे, अशा येत असलेल्या अनेक तांत्रिक अडचणींबाबत कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा तर्फे राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या उपआयुक्तांना निवेदन देण्यात आले.
कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा च्या पदाधिकाऱ्यांनी राज्य वस्तु व सेवा कर कार्यालय, रत्नागिरी येथे उपआयुक्त श्री. संदीप माने सर यांची भेट घेऊन महाGST पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः VAT तसेच व्यावसाय कर देयक व परतावे भरण्याच्या प्रक्रियेत करदात्यांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच संकेतस्थळावरील तांत्रिक समस्यांमुळे करदात्यांना वेळेत परतावे दाखल करण्यात अडथळे येत असल्याने संबंधित मुदती वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी असोसिएशन चे अध्यक्ष श्री. रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सीए अभिजीत पटवर्धन, सचिव अॅड. रवींद्र साळवी, तसेच सदस्य अॅड. अभिजीत बेर्डे, अॅड. उज्ज्वल बापट, श्री. राजेश गांगण , अॅड. निलेश भिंगार्डे , सीए चैतन्य वैद्य आणि श्री. दिनकर माळी उपस्थित होते. तसेच व्यवसाय कर विभागाच्या अधिकारी श्रीमती शिंदे मॅडम ही या वेळी उपस्थित होत्या .
उपआयुक्त श्री. संदीप माने सर यांनी असोसिएशन चे निवेदन स्वीकारून संबंधित समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले.




