
शीळ गुरववाडी येथे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणावर राजापूर पोलिसांची कारवाई
राजापूर : तालुक्यातील शीळ गुरववाडी येथे सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरड करून धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणाला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकांच्या शांततेस बाधा निर्माण केल्याप्रकरणी या तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रकाश लीलाधर पांचाळ (वय ३०, रा. शीळ गुरववाडी, राजापूर) हा तरुण गावातील सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत धुंद अवस्थेत आढळून आला. तो दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरड करत सार्वजनिक शांततेचा भंग करत होता. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आकाश यशवंत वळवी यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आकाश वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात प्रकाश पांचाळ याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) आणि ८५(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी नशा करून उपद्रव करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.




