कुवारबाव कचरा संकलनासाठी घंटागाडी उपलब्ध; जागेअभावी प्रक्रिया रखडली

नूतन पंचायत समिती सभापती व उपसभापती आहे यांना निवेदन : तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन

रत्नागिरी : कुवारबाव परिसरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने घरगुती कचरा संकलनासाठी घंटागाडी उपलब्ध केली असली, तरी कचऱ्याची साठवणूक व प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने ही सुविधा प्रत्यक्षात आणता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ व उपसभापती गजानन धनावडे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, “घंटागाडी उपलब्ध असूनही कचरा संकलन सुरू झाल्यास तो कुठे साठवायचा, वर्गीकरण व प्रक्रिया कशी करायची याबाबत स्पष्ट व्यवस्था नसल्याने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा लाभ नागरिकांना मिळत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी वाढत असून, अनियमित कचऱ्याची विल्हेवाट होण्याची भीती व्यक्त केली आहे. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर आहे.”

या तक्रारीची दखल घेत सभापती श्री. पांचाळ व उपसभापती श्री. धनावडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी लवकरच कचरा साठवणुकीसाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रशासकीय कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला. नागरिकांच्या अपेक्षेनुसार तातडीने पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे निवेदन भाजपा तालुका रत्नागिरी मध्य मंडळाचे कोषाध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख (पंचायत समिती गण कुवारबाव) दीपक आपटे यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद नाचणेचे सदस्य प्रकाश रसाळ यांना दिले. यात ग्रामसभेच्या ठरावाने मागणी केलेल्या भूखंडाची शहानिशा करण्याबाबत व तो भूखंड गावच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्यास काय अडचणी आहेत याबाबत जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती श्री. आपटे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button