प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) व प्रधानमंत्री मत्स्य संपदा (PMMSY) योजनांबाबत भाट्ये येथे जनजागृती शिबिर संपन्न

             वित्तीय सेवा विभाग (DFS) यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) यांसाठी बँक ऑफ इंडिया ही नोडल बँक असून, या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक श्री. नरेंद्र रघुनाथ देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँक ऑफ इंडिया रत्नागिरी अंचल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व मत्स्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विध्यमानाने जनजागृती शिबिराचे आयोजन दिनांक 10 मार्च 2026 रोजी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे करण्यात आले.

              या कार्यक्रमास अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. दर्शन कानसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिवकुमार सदाफुले, श्री. संकेत सकपाळ वरिष्ठ प्रबंधक (कृषी विभाग) बँक ऑफ इंडिया, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सौ. लतिका गावडे तसेच डॉ. किरण मालशे, कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शिबिराचे प्रास्ताविक व उद्देश श्री. दिनकर कुटे, वरिष्ठ प्रबंधक, स्टार कृषी विकास केंद्र, रत्नागिरी (बँक ऑफ इंडिया) यांनी मांडले. यावेळी PMFME व PMMSY योजनांअंतर्गत उपलब्ध अनुदान, बँक कर्ज सुविधा तसेच अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी PMFME योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन शिबिरात उपस्थित नवीन संभाव्य लाभार्थ्यांची नोंद (लीड जनरेशन) करण्यात आली.

               सदर शिबिरादरम्यान जिल्ह्यातील PMFME व KCC फिशरीज योजनेअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रकरणांमधील अडचणींचा आढावा घेऊन संबंधित कृषी अधिकारी, बँक जिल्हा समन्वयक, बँक अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आणि लाभार्थी यांच्या समन्वयातून त्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा अधिकारी श्री. संकेत लेंडे यांनी केले. कार्यक्रमास विविध बँकांचे अधिकारी, जिल्हा समन्वयक, कृषी व मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button