
मसाला वाटून दे असे आईने सांगितल्याच्या रागातून वाद, सख्ख्या मुलाने आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून तिला गंभीर जखमी केले
मसाला वाटून दे असे आईने सांगितल्याच्या रागातून वाद विकोपाला जाऊन सख्ख्या मुलाने आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सात वाजता तुम्हाला लांजा घावणेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, लांजा, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हा रात्रीच्या जेवणासाठी कोळंबी घेऊन घरी आला होता. त्यानंतर त्याची आई सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) यांनी कोळंबी साफ करून झाल्यानंतर ती बनवण्यासाठी संतोषला मसाला वाटून देण्यास सांगितले. यावरून आई-मुलामध्ये वाद निर्माण झाला. मात्र हा वाद विकोपाला जाऊन मुलगा संतोष दिवाळे याने संतापाच्या भरात आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. तसेच तिचा शर्टाने गळा आवळून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीत सुनिता दिवाळे यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेनंतर त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी मुलगा संतोष गणपत दिवाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड करीत आहेत.




