
श्वान चावल्यावर रेबीज होऊ नये म्हणून तातडीने करा ‘हे’ काम; इंजेक्शन किती वेळा घ्यावे, कशी घ्यावी काळजी? डॉक्टरांनी दिली माहिती!
Prevention and Treatment of Dog Bites : श्वान चावणे ही केवळ शारीरिक जखम नाही, तर ती एक गंभीर समस्या आहे. रेबीजची लागण झालेल्या श्वानाने तुमच्या शरीरावर काढलेला छोटासा ओरखडादेखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वैद्यकीयदृष्ट्या, रेबीज हा एक असा आजार मानला जातो, ज्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यावर उपचार करता येत नाही. पण, वेळेवर लसीकरण करून, तो १००% नियंत्रणात आणू शकतो. बऱ्याचदा काही मंडळी अशा मोठ्या समस्यांवर घरगुती उपचार करून वेळ वाया घालवतात. पण, तज्ज्ञांच्या मते, श्वान चावल्यानंतरचे पहिले काही तास सर्वांत महत्त्वाचे असतात.
एशियन हॉस्पिटलमधील असोसिएट डायरेक्टर व इंटर्नल मेडिसिन (युनिट III) प्रमुख डॉक्टर सुनील राणा यांनी स्पष्ट केले की, जर श्वान चावल्यावर त्वरित उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. श्वान चावल्यानंतर शरीरात नेमके काय बदल होतात, कोणती लक्षणे दिसतात आणि त्या जखमेवर प्रथमोपचार कसे करावेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात…
श्वान चावल्यानंतर प्रथमोपचार कसा करावा?
डॉक्टरांच्या मते, श्वान चावल्यानंतर…
- त्या व्यक्तीच्या शरीरावर झालेली जखम ताबडतोब साबणाने आणि वाहत्या पाण्याने किमान १० ते १५ मिनिटे धुऊन स्वच्छ करावी.
- खरंच गरज नसेल, तर जखमेवर मलमपट्टी करू नका. कारण- त्यामुळे विषाणू शिरांमध्ये खोलवर जाऊ शकतो. जखम उघडी ठेवणे किंवा हलकीशी झाकणे चांगले ठरेल.
- पाळीव प्राणी असो वा भटका श्वान चावला तरी, त्वरित वैद्यकीय मदत आणि अँटी-रेबीज इंजेक्शन (एआरव्ही) घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- साधारणपणे, २४ तासांच्या आत तुम्ही लस घेतली पाहिजे.
श्वान चावल्यानंतर शरीरात काय होते?
श्वानाच्या लाळेमध्ये असलेला विषाणू किंवा जीवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करू शकतो. जर कुत्र्याला रेबीजची लागण झाली असेल, तर हा विषाणू हळूहळू नसांमधून मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. सुरुवातीला लक्षणे सौम्य असतात. पण, कालांतराने हा आजार प्राणघातक ठरू शकतो. WHO च्या अधिकृत अहवालानुसार, रेबीज (Rabies) हा एक झुनोटिक आजार (zoonotic disease) आहे. म्हणजे हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. WHO ने म्हटले आहे की, एकदा रुग्णामध्ये पाण्याची भीती किंवा भ्रम यांसारखी रेबीजची लक्षणे दिसली की, मग १०० टक्के असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. जगभरात अशी फार कमी प्रकरणे आहेत, जिथे लक्षणे दिसल्यानंतरही एखादी व्यक्ती जिवंत राहिली आहे.
श्वान चावल्यानंतर दुर्लक्ष करू नये अशी सुरुवातीची लक्षणे…
श्वान चावल्यानंतर शरीरात काही सुरुवातीची लक्षणे जाणवू शकतात, जसे की…
- जखमेभोवती वेदना किंवा जळजळ
- सूज आणि लालसरपणा
- डोकेदुखी किंवा अशक्तपणा
- जखमेच्या ठिकाणी मुंग्या येणे
- ताप
जर संसर्ग वाढला, तर अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात, जसे की :
- पाण्याची भीती (हायड्रोफोबिया)
- श्वास घेण्यास त्रास
- अस्वस्थता आणि गोंधळ
- स्नायूंमध्ये गाठ किंवा सूज येणे
डॉक्टर काय म्हणतात?
डॉक्टर सुनील राणा यांनी स्पष्ट केले की, श्वान चावल्यानंतर जखम ताबडतोब साबणाने आणि वाहत्या पाण्याने किमान १०-१५ मिनिटे पूर्णपणे धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर विनाविलंब जवळच्या रुग्णालयात जा आणि अँटी-रेबीज लस घ्या. उपचारांना उशीर केल्याने संसर्गाचा धोका वाढतो. जर जखम खोल असेल किंवा जास्त रक्तस्राव होत असेल, तर रुग्णाला अँटी-रेबीज लसीसह रेबीज इम्युनोग्लोबुलिन दिले जाते, जे सुरुवातीच्या टप्प्यात विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करते. जागरूकता आणि वेळेवर उपचार केल्याने रेबीजसारखे धोकादायक आजार टाळता येतात.
किती इंजेक्शने दिली जातात?
डॉक्टरांच्या मते, रेबीजविरोधी लस एका निश्चित वेळापत्रकानुसार दिली जाते. ती सहसा ०, ३, ७, १४ व २८ दिवसांच्या अंतराने दिली जाते. कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, इंजेक्शनची संख्या श्वान कशा प्रकारे चावला आहे, त्यावर अवलंबून असते.
आजार टाळण्यासाठी काय करावे?
- श्वान चावल्यानंतर जखम ताबडतोब धुवा.
- रुग्णालयात जा आणि शक्य तितक्या लवकर लसीकरण करा.
- जखमेवर घाण, तेल किंवा इतर कोणतीही घरगुती वस्तू लावू नका.
- लसीकरणाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करा.
- मुलांना भटक्या श्वानांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- रेबीजची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यावर कोणताही इलाज नाही. म्हणून श्वान चावल्यानंतर ती गोष्ट हलक्यात घेऊ नका. घरगुती उपचार करून वेळ वाया घालवू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.




