
महिला दिनानिमित्त कारवांचीवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ४० महिलांची तपासणी
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साई मंदिर, आदर्श वसाहत कारवांचीवाडी (रत्नागिरी) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तालुका रत्नागिरी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तसेच ग्रामीण रुग्णालय पालीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुमरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे शिबिर पार पडले.
या शिबिराला सरपंच श्रीमती ममता जोशी, रोटरी क्लब मिड टाउनचे अध्यक्ष दादा कदम तसेच डॉ. स्वप्ना करे, डॉ. स्वाती पाटील, डॉ. अभिजीत मोहिते, डॉ. नेहा बोले, डॉ. देवदत्त बोले, डॉ. अमित घुले, डॉ. स्वप्नल साळवी आणि डॉ. मीनल जोग उपस्थित होते. तसेच आरबीएसके स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एनसीडी स्टाफ आणि लॅब टेक्निशियन यांनीही शिबिरात सहभाग नोंदवला.
आरबीएसके पथक क्रमांक १, २, ३ आणि ४ यांच्यातर्फे एकूण ४० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांना मोफत औषधोपचार, मोफत लॅब तपासण्या तसेच मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक महिलांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.




