
बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापर करून संगमेश्वरात बांगलादेशी महिलेला आश्रय;*
- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जाणारी घटना उघडकीस आली आहे. बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे आश्रय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर तिला भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करण्यात आल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा धडक कारवाई करत संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेड खुर्द येथील मुस्लिम मोहल्ल्यात राहणाऱ्या युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपूर, ढाका, बांगलादेश) हिच्याशी ती परदेशी नागरिक असल्याचे माहिती असतानाही विवाह केला. आरोपी युसूफने तिला आश्रय देण्याबरोबरच भारतीय प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी तिची बनावट कागदपत्रे तयार करून घेतल्याचा आरोप आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले होते. यामुळे भारतीय प्रशासकीय तसेच बँकिंग व्यवस्थेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी ६ मार्च रोजी दुपारी आंबेड खुर्द येथील संशयित पत्त्यावर छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पारपत्र नियम तसेच परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



