
उद्या महाबळेश्वरला येत असाल तर थांबा.! रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात रविवारी बंदचे आवाहन!
सातारा : शनिवार, रविवार सुट्टीवेळी पाचगणी महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र उद्याच्या रविवारी (दि. ८) महाबळेश्वरला जात असाल तर थांबा. महाबळेश्वरकडे येणाऱ्या सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ट आणि संथ कामाविरोधात रविवारी (दि. ८) महाबळेश्वर बंद पाळण्यात येणार आहे.
वारंवार मागणी करूनही सुरूर ते पोलादपूर या मार्गाच्या कामाला गती मिळत नसल्याने महाबळेश्वर शहर बंद करण्यात येणार आहे. रविवारच्या महिलादिन व रंगपंचमीच्याच दिवशी महाबळेश्वरचे नागरिक कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करणार आहेत. या आंदोलनानंतरही जर रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही तर शहर बेमुदत बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय महाबळेश्वर येथील नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असून, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे पाचगणी ते महाबळेश्वर हा २० कि. मी. रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी उखडलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तसेच कामामुळे उडणारी धूळ त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक व प्रवाशांना, पर्यटकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी या मार्गावरून प्रवास करणे सोडून दिले असून, त्यांनी लांबचा पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. परंतु, विद्यार्थ्यांना मार्ग बदलता येत नाही, त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणारे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.
वाई येथून अनेक लोक रोजगारासाठी पाचगणी, महाबळेश्वरला जात असतात. त्यांनाही या रस्त्याचा मोठा त्रास आहे. सुरूर पोलादपूर रस्त्यासह शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी पेटीट ग्रंथालयाच्या मैदानावर पक्षविरहीत बैठक बोलावून नागरिकांना आमंत्रित करण्यात आले. कुंभारदरे यांच्या आवाहनास शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, हॉटेल संघटनेसह नागरिक या बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमल पार्टे, नगरसेवक संतोष शिंदे, अफजल सुतार, संजय जंगम, नगरसेविका स्मिता पाटील, विशाल तोष्णीवाल, संदीप साळुंखे, रमेश कौल, रमेश पलोड, अतुल सलागरे, वृषाली डोईफोडे, यशवंत घाडगे, शंकर ढेबे, सविता पलोड, अमित ढेबे, राजश्री भिसे, महेश गुजर, हेमंत साळवी, अंकित पलोड, योगेश बावळेकर उपस्थित होते.
या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही तर महाबळेश्वरचे नागरिक मंत्रालयाबाहेर काळे झेंडे व निषेधाचे फलक घेवून आंदोलन करतील, असा इशाराही बैठकीचे निमंत्रक राजेश कुंभारदरे यांनी दिला. महाबळेश्वरकरांच्या आंदोलनात पाचगणी व वाई शहरांनी देखिल सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत कुंभारदरे यांनी स्पष्ट केले.




