
गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम


मार्च महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते होळीचे. कोकणात आज सकाळपासून अनेक ठिकाणी होळी साजरी झाली. या होळीला कोकणात तेरसेचे होम असे म्हटले जाते. आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी तेरसेचे होम पेटवण्यात आले.


पहाटेपासूनच होळीला सुरुवात होते आणि नव्याने लग्न झालेले तरुण त्या होमाला ५ फेऱ्या मारून त्यात नारळ वाहतात. तसेच कोकणातील पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते. यावेळी गावच्या देवीच्या नावाने आरोळी (फाका) देण्यात आल्या.
कोकणात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून, कामानिमित्त बाहेरगावी असणारे सर्व चाकरमानी आपली सगळी कामं बाजूला सारून न चुकता होळीसाठी आपल्या गावाला दाखल झाली आहेत. गुहागर तालुक्यातील मुंढर गावात सगळे गावकरी व चाकरमान्यांनी एकत्र येत होळीचा मनमुराद आनंद लुटला.




