वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ‘ईठ्ठला’ नाटकावर तात्काळ बंदी घाला – लांजा तालुका वारकरी संप्रदायाची मागणी


  वारकरी संप्रदाय, संतपरंपरा आणि भगवान श्री विठ्ठल यांच्या संदर्भात विकृत व अवमानकारक सादरीकरण करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकावर तात्काळ बंदी घालावी, तसेच ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ मधून ते बाद करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी संप्रदायाने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना तसेच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार, पालकमंत्री श्री. उदय सामंत, आमदार श्री. किरण सामंत यांना जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.
रत्नागिरी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात वीर शैव समाज निर्मित श्री. अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक अमोल रंगायत्रीतर्फे सादर करण्यात आले. हे लांजा व रत्नागिरी येथील ३० हून अधिक वारकरी व हिंदुत्वनिष्ठांनी पाहिले. हे नाटक वारकरी संप्रदायाचे विकृत सादरीकरण करणारे आणि समस्त विठ्ठल भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे, हे त्यांच्या निदर्शनास आले. 
    महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदाय हा अहिंसा, भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचे मर्म सांगितले आहे. भगवान श्री विठ्ठलाच्या भक्तीमुळे व्यसने सुटल्याचा, सन्मार्गाला लागल्याचा, स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचा अनुभव असंख्य वारकऱ्यांनी घेतला असून अजूनही घेत आहेत आणि यापुढेही घेत राहतील. मात्र 'ईठ्ठला' या नाटकात पांडुरंगाची (श्री विठ्ठलाची) भक्ती आणि त्याचे नामस्मरण करणारे वारकरी दांपत्य पांडुरंगाच्या नामस्मरणात बेभान होऊन नाचत १० निष्पाप माणसांच्या हत्या करतात, असे दाखवले आहे. हे अविश्वसनीय असून हा एक प्रकारे वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठल भक्तांचा अवमानच आहे. नाटकातील पात्रांना तुका, जना, नामा अशी संतांची नावे देऊन एक प्रकारे वारकरी संतांचा अवमानच केला आहे. 
 लोभापाई माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा आशय नाटकातून व्यक्त होत आहे, तर त्याला अनुसरून नाटकाचे नाव न ठेवता 'ईठ्ठला' हे नाव नाटकाला ठेवून श्री विठ्ठलाची विटंबनाच केली आहे.

या नाटकामध्ये वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांचा उपहास असून विठ्ठल भक्तीविषयी गैरसमज, संशय व साशंकता निर्माण करणारे आणि वारकरी तत्त्वज्ञानाच्या पूर्ण विरोधात हे नाटक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘ईठ्ठला’ या नाटकावर तात्काळ बंदी आणावी. तसेच या नाटकाच्या पुढे होणाऱ्या सर्व प्रयोगांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ च्या अंतिम फेरीत सादर झालेल्या या नाटकास कोणताही क्रमांक, उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात येऊ नये आणि स्पर्धेतून हे नाटक बाद करण्यात यावे. यापुढे कुठेही या नाटकाचे प्रयोग करू नयेत, अशी सक्त ताकीद या नाटकाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते यांना देण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
या गंभीर बाबीची तातडीने दखल शासनाने घ्यावी; अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही वारकरी संप्रदायातर्फे देण्यात आला आहे.
या वेळी सर्व ह.भ.प. मनोहर रणदिवे, तुळशिराम मोरे, विष्णू लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, पांडूरंग शिंदे, मनोहर करंबेळे, किशोर लांजेकर, भिकाजी लांजेकर, हिंदु जनजागृती समितीचे भैरूलाल भंडारी, सकल हिंदु समाजाचे अधिवक्ता रूपेश गांगण, सनातन संस्थेचे विष्णुदास म्हात्रे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अमितराज खटावकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button