
फळांवर लावलं उंदीर मारण्याचं औषध; मुंबईतील भयंकर प्रकार कॅमेऱ्यात कैद
फळे आरोग्यासाठी लाभदायक असतात आणि त्यामुळेच आपण सर्वजण फळे बाजारातून खरेदी करुन खातो. तुम्ही सुद्धा बाजारातून खरेदी केलेली फळे चवीने खाता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.कारण, मुंबईच्या उपनगरातील मलाड परिसरातून ग्राहकांच्या जिवाशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी त्यावर चक्क ‘रेटिनॉल’ नावाचे उंदीर मारण्याचे विषारी औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोन फळ विक्रेत्यांना मलाड पोलिसांनी अटक केली आहे. मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
असा उघड झाला प्रकार
हा सर्व प्रकार स्थानिक नागरिक कुणाल साळुंके यांच्या सतर्कतेमुळे समोर आला. साळुंके यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली होती की, काही विक्रेते फळांवर विषारी पदार्थ लावत आहेत. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत मलाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.




