
कोल्हापूर शाहूवाडी येथे संगेमश्वर कसबा येथील तरुणाचा अपघाती मृत्यू
संगमेश्वर : कोल्हापूर येथे कामासाठी गेलेल्या संगमेश्वरच्या तरुणाचा शाहूवाडी येथे अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गजेंद्र शिवाजी देशमुख (वय ४४) असे मृत तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर येथे किराणा मालाची खरेदी करून गजेंद्र देशमुख हे दुचाकीवरून घरी परतत असताना हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे कोल्हापूर येथे किराणा माल खरेदी करून त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीए ९००५) वरून कसबा येथे परतत होते. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील वालुर गावच्या हद्दीत कचरे यांच्या बागेजवळ समोरून येणाऱ्या सुझुकी सुपर कॅरी (क्रमांक एमएच ०९ एफएल ९५०१) वाहनाची धडक दुचाकीला बसली. हे वाहन चालक तुकाराम शंकर माने (रा. वालूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा चालवीत होते. या अपघातात धडकेत गजेंद्र देशमुख यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे वडील शिवाजी देशमुख यांनी शाहूवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४६/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये तुकाराम माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्लानी करीत आहेत.




