
कोकणातील आंबा बागायतदारांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : शौकत मुकादम
कोकणातील भात शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही शासनाकडून पंचनामे करून अद्याप एकही रुपया नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा कोकणातील शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय असून, आता बागायतदारांवर दुसरे संकट ओढावले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी व्यक्त केली आहे.
दूषित हवामानामुळे कोकणातील हापूस आंबा, काजू तसेच परस बागांमधील आंब्यांच्या झाडांवरील मोहर मोठ्या प्रमाणात करपून गेला आहे. त्यामुळे बागायतदारांचे संपूर्ण हंगामी उत्पन्न धोक्यात आले असून खत, फवारणी व देखभालीसाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे.
मुकादम पुढे म्हणाले की, कोकणामध्ये भात शेती व हापूस आंबा ही दोन प्रमुख पिके असून, येथील बहुतांश शेतकरी व बागायतदारांचा वर्षभराचा उदरनिर्वाह याच पिकांवर अवलंबून असतो. मात्र हापूस व काजूवरील करप्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
त्यामुळे कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून शासनाने कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी ठाम मागणी शौकत मुकादम यांनी शासनाकडे केली आहे.




