
रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी केली पालखी मार्गाची पाहणी
रस्त्यांच्या स्वच्छतेबरोबरच पथदीपांच्या व्यवस्थेकडे ही विशेष लक्ष देण्याच्या सूचना


रत्नागिरी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी पालखी मार्गाची पाहणी केली.
श्री देव भैरी हे रत्नागिरीचे ग्रामदैवत आहे. शिमगोत्सवाच्या काळात विविध गावांतील पालख्यांचे आगमन आणि मुख्य पालखीची ग्रामप्रदक्षिणा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी आणि जोगेश्वरी यांच्या पालखी सोहळ्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कंबर कसली आहे. ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव म्हणजे रत्नागिरीकरांसाठी भक्ती आणि आनंदाचा सोहळा असतो. या उत्सवात श्री देव भैरीची ग्रामप्रदक्षिणा होते आणि आसपासच्या गावांतील पालख्या देखील भेटीला येतात. या पार्श्वभूमीवर श्री देव कालभैरव मार्ग (खालची आळी) येथील रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाची नगराध्यक्षांनी पाहणी केली.
उत्सवापूर्वी सर्व पालखी मार्ग सुस्थितीत असावेत, जेणेकरून भाविकांना आणि पालखी सोहळ्याला कोणताही त्रास होणार नाही, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षांसोबत नगरसेवक राजेश तोडणकर आणि पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिमगोत्सवाच्या काळात शहरात होणारी गर्दी आणि पालखीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्त्यांसोबतच स्वच्छता आणि पथदीपांच्या व्यवस्थेकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
शिमगोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा कणा आहे. ग्रामदैवत श्री देव भैरीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी आणि पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे, असे सौ. सुर्वे यांनी सांगितले.




