
पीयूसीसी सेवेसाठी वाहन मालकाचा आधार प्रमाणिकरण केलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य
रत्नागिरी, दि. ५. :- केंद्र शासनाच्या सूचनांनुसार वाहन मालकांचे अद्ययावत संपर्क तपशिल वाहन प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पीयूसीसी, विमा, कर, दंड (इ-चलन) इत्यादी वाहनासंबंधी महत्वाच्या सूचना वाहनधारकांपर्यंत पोहचण्यात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पीयूसीसी सेवेसाठी वाहन मालकाचा आधार प्रमाणिकरण केलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार पीयूसीसी सेवा देताना वाहन मालकाचा आधार-प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्यास पीयूसीसी सेवा देण्यात येणार नाही, याची नोंद सर्व वाहन मालकांनी व पीयूसीसी केंद्रांनी घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
सदर प्रक्रिया वाहन प्रणालीवर दोन स्तरीय प्रमाणीकरण (Two Factor Authentication) वापरून राबविण्यात यावीत. ही संपूर्ण अंमलबजावणी एका महिन्याच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात यावी असेही सूचित करण्यात आले आहे.




