
रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती,१७९ कासवांची घरटी १८,७३६ अंड्यांचे संवर्धन;
रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले असून, अंड्यातून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली आहेत.गुहागर येथे टॅगिंग केलेली चार कासवे पुन्हा अंडी घालण्यासाठी परतली असून, यामुळे कासव आपल्या मूळ स्थानीच अंडी घालण्यासाठी येतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
थंडीचा कडाका अन् विणीचा हंगाम जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, हे वातावरण कासवांच्या विणीसाठी पोषक मानले जाते. यावर्षी कासव विणीचा हंगाम काहीसा लांबला आहे. मात्र, सध्या ज्या वेगाने कासवे किनाऱ्यांकडे येत आहेत, ते पाहता फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे संवर्धन होईल, असा अंदाज वन विभाग आणि कासव मित्र संस्थांनी व्यक्त केला आहे.




