भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा-हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार!


  • भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने २०२४ आणि २०२५ मध्ये विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. २०२४ मध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला. तर २०२५ मध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक आपल्या नावे केला. भारतीय क्रिकेटमधील आपल्या अतुल्य योगदानाबद्दल या दोन्ही कर्णधारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि टीम इंडियाचा टी-२० विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी, भारत सरकारने दरवर्षीप्रमाणे पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. क्रीडा क्षेत्रातील अनेक स्टार खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात प्रमुख नावांमध्ये भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याची महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे.

देशातील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रविवार, २५ जानेवारी रोजी सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी, सरकारने एकूण १३१ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने पाच जणांना सन्मानित केलं जाणार आहे. तेरा जणांना पद्मभूषण आणि एकूण ११३ जणांना पद्मश्री प्रदान करण्यात आला आहे. क्रीडा जगतातून एक पद्मभूषण आणि आठ पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

क्रीडा जगातातील पद्म पुरस्कारांची यादी

विजय अमृतराज – पद्मभूषण
रोहित शर्मा – पद्मश्री
हरमनप्रीत कौर – पद्मश्री
प्रवीण कुमार – पद्मश्री
बलदेव सिंग – पद्मश्री
भगवानदास रायकवार – पद्मश्री
के. पजनेवेल – पद्मश्री
सविता पुनिया – पद्मश्री
व्लादिमीर मेस्तविरिशविली (मरणोत्तर) – पद्मश्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button