दुर्गम भागातल्या चिमुकल्यांच्या चेहेऱ्यावर फुलले हास्य

जायंट्स् ग्रुप ऑफ कुवारबाव सहेलीमार्फत नाखरे कालकर कोंड शाळेत मोफत दंत चिकित्सा उपक्रम

रत्नागिरी : शहरी वातावरणापासून दूर एका दुर्गम भागात वसलेल्या नाखरे गावातील शेवटचे टोक असलेल्या कालकर कोंड शाळेत जायंट्स् ग्रुप ऑफ कुवारबाव सहेलीच्या माध्यमातून मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दंतचिकित्सक पोचले आणि त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
अतिशय दुर्गम भाग असलेल्या नाखरे कालकर कोंड गावात ना मोबाईल टॉवर, ना नेटवर्क आणि गावात जाणाऱ्या मोजून तीन बस. अगदी आडबाजूला असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे कालकर कोंड शाळेत पहिली ते सातवी मिळून फक्त ३६ मुले असून, याठिकाणी कोणतीही सुविधा पोचणे अगदी कर्मकठीण; मात्र २१ जानेवारी हा दिवस इथल्या या मुलांसाठी खास ठरला. कारण फारस कोणी न जाणाऱ्या या शाळेत शहरातून एक डॉक्टर त्यांच्या भेटीला गेले होते. निमित्त होते ते ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानांतर्गत जायंट्स् ग्रुप ऑफ कुवारबाव सहेलीमार्फत दंत चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर तसेच माता पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे.
अत्यंत आडगावात असणाऱ्या या शाळेतल्या मुलांना हा कार्यक्रम म्हणजे जणू एक आनंदमेळाच होता. रत्नागिरी शहरातील दंतचिकित्सक डॉ. ऋषिकेश जोशी यांनी अंगणवाडी आणि शाळेतील सर्व चिमुकल्यांची मोफत दंत तपासणी केली. त्याचवेळी जायंट्स ग्रुप ऑफ कुवारबाव सहेलीच्या अध्यक्षा मेघना परांजपे, फेडरेशन डायरेक्टर सौ. सुवर्णा चव्हाण आणि सौ. अनुया बाम यांनी त्यांना टूथपेस्ट आणि खाऊच वाटप केले. यावेळी डॉ. जोशी यांनी दातांच्या स्वच्छतेबद्दल माहिती दिली आणि छान गप्पा मारत त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयींबाबत मार्गदर्शन केले. अत्यंत कष्ट करत आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी झटणाऱ्या उपस्थित सर्व महिला पालकांसाठी या निमित्ताने हळदी-कुंकू आणि तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही जोशी, श्री. लिंगायत, श्री. पावसकर या शिक्षकांनी सहकार्य केले. अत्यंत दुर्गम असणाऱ्या या शाळेत असेच नवनवीन उपक्रम अवश्य राबवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी उपस्थित सर्व महिला पालकांनी जायंट्स् ग्रुप ऑफ कुवारबाव सहेलीकडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button