दाभोळे जिल्हा परिषद गटातून विलास चाळके यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

दाभोळे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके यांना शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याने दाभोळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे.
विलास चाळके यांनी जिल्हा परिषदेत शिक्षण व अर्थ सभापती म्हणून काम करताना विकासाभिमुख धोरण राबवले. शाळा दुरुस्ती, शैक्षणिक सुविधा वाढवणे, आर्थिक शिस्त आणि निधीचा योग्य वापर यावर त्यांनी विशेष भर दिला होता. त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीमुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चाळके यांच्या उमेदवारीचे स्वागत केले असून, दाभोळे गटात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी थेट संपर्क असलेला नेता म्हणून चाळके यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विलास चाळके यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “दाभोळे गटातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी विकासकामांचा अजेंडा घेऊन मी मैदानात उतरलो आहे. शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर भर देत जनतेसाठी काम करणार,” असे सांगितले.
दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. शिवसेनेकडून संघटन मजबूत करत व्यापक प्रचाराची रणनीती आखली जात असून येत्या काळात प्रचाराला अधिक वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button