
डीबीजे महाविद्यालयात २० आणि २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषेचा वापर करून प्रादेशिक भाषा, मानव्य शास्त्र आणि मूलभूत विज्ञानात संशोधन कौशल्य विकसित करणे” या विषयावर दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
परिषदेचे उद्घाटन मंगळवारी (२० जानेवारी) रोजी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, रजिस्टर विजय जाधव हे उपस्थित राहणार आहेत. ही परिषद भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाच्या सहकार्याने होत आहे.
या परिषदेचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टिकोनाशी सुसंगत सर्व विषयांमध्ये वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावलींचा वापर करून संशोधन करणे, प्रादेशिक भाषांना संशोधन पद्धतीशी एकत्रित करण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी शिक्षण तज्ञ व अभ्यासकांना एका व्यासपीठावर आणणे तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात स्पष्टता, सुलभता आणि समावेशकता आणण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.
या परिषदेत विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील तज्ञ मार्गदर्शक सहभागी अभ्यासकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. प्रताप नाईकवडे, डॉ. नारायण भोसले, प्राचार्य डॉ. वसंत माळी, डॉ. राजशेखर हिप्परगी, डॉ. व्ही. डी. वासमकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. पुरुषोत्तम कुंदे आदी मान्यवर आपले सादरीकरण करणार आहेत. या परिषदेला शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी, संशोधकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेचे समन्वयक डॉ. सुधीर मोरे व प्रा. राजरत्न दवणे यांनी केले आहे.




