
पोलीस अधीक्षकांनी घेतली दापोली पोलीस ठाण्याची वार्षिक निरक्षण तपासणी
नागरिकांशी साधला थेट संवाद
दापोली : रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक निरीक्षण आढावा घेतला. या अढाव्या दरम्यान त्यांनी दापोली पोलीस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी केली व पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांची सद्यस्थिती, प्रलंबित तपास प्रकरणे, मुद्दे माल निर्गती तसेच प्रतिबंधात्मक कारवायांची माहिती घेतली व सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी श्री. बगाटे यांनी दापोली पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस विभागाच्या विविध कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस दलात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांच्या तक्रारींकडे तत्परतेने लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे तसेच अंमली पदार्थ खरेदी-विक्री व सेवनाच्या विरोधात “मिशन फिनिक्स” अंतर्गत कडक मोहीम राबवण्याचे आदेशही यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आले. दापोली हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या.
या भेटीच्यावेळी श्री. बगाटे यांनी पोलीस अंमलदार यांच्याशी संवाद साधत सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले व नवीन पोलीस वसाहतींच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
या वार्षिक निरीक्षण तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दापोली तालुक्यामधील सर्व पोलीस पाटील व नागरिकांची बैठक घेतली व त्यांच्याशी थेट संवाद साधत कायदा व सुव्यवस्था तसेच विविध सामाजिक विषयांवर, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, महिलांची व नागरिकांची सुरक्षितता तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली. नागरिकांना कोणतीही संशयास्पद घटना अथवा व्यक्ति माहिती द्यावयाची असल्यास त्वरित डायल ११२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
या बैठकी दरम्यान बगाटे यांनी नागरिकांनी मांडलेल्या त्यांच्या सूचना, तक्रारी व समस्येंचे निवारण व समाधान केले.
या प्रसंगी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश तोरस्कर तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक उपस्थित होते.




