
जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित, मच्छीमार नौकांना मासळीची टंचाई
समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने मच्छीमार नौकांना गेल्या चार दिवसांपासून मासळी मिळेनाशी झाली आहे
. खोल समुद्रातही हीच अवस्था आहे. रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे.उलट वाऱ्यामुळे रापणाचे रोप तुटून नुकसान होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात सुमारे 3 हजार 387 मच्छीमार नौका आहेत. यातील पर्ससीन किंवा यांत्रिकी नौका साडेबारा नॉटीकल मैलच्या बाहेरील समुद्रात जाऊन मासेमारी करत आहेत. इतर नौका साडेबारा नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करत आहेत. परंतु कोणत्याच नौकाना खर्चाइतकी मासळी मिळेनाशी झाली आहे. दोन-तीन दिवसांसाठी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकाना अवघे तीन ते चार टपच मासळी मिळत आहे. यामध्ये छोटी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
मासेमारी करणाऱ्या नौकाना इंधन, खलाशांचे रेशन पाणी भरून देणे त्याचबरोबर खलाशांचे आठवड्याचे पगार देण्याचा खर्च असतो. हा खर्चही सुटत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे उलट समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रापणाचे रोप तुटण्याचे प्रकार घडून ते रापण जाळे समुद्रात अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. लाखो रुपये किमतीची जाळी किंवा रापण यामुळे नादुरुस्त होत आहेत.




