अनिकेत परवडी याच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

राजापूर : तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर येथे विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत परवडी याच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून त्याला न्याय मिळवून द्यावा, कुटुंबाला २५ लाखांची तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील सदस्याला महावितरणमध्ये नोकरीत समावून घ्यावे, अशा मागण्या करत तिठवली, धोपेश्वर गावासह भू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरणाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत असलेला अनिकेत परवडी गत आठवड्यात मंगळवारी पेंडखळे भवानी मंदिर येथे बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी काम करत होता. ऑपरेटरकडून वीज वाहिनी बंद करून तो दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढला होता; मात्र अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ऑपरेटरच्या चुकीमुळे अनिकेत याला जीव गमवावा लागल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत मृतदेह रूग्णालयात ठेवला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत याबाबत ग्रामस्थ व महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल २२ तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी राजापूर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली; मात्र त्या ठिकाणी महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने सायंकाळी भू ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी भू पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच तिठवली व धोपेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अनिकेतच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या ऑपरेटरवर कारवाई करावी तसेच अनिकेतच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला महावितरणमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी केली.
महावितरणमधील अधिकार्‍यांमुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या स्थानिक तरुणाला नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. अनिकेतला लवकरात लवकर न्याय द्यावा तसेच यापुढे अशी घटना घडल्यास महावितरणच्या कोणत्याही अधिकार्‍याची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी दिला.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघून उपस्थित अधिकार्‍यांनी संबंधित ऑपरेटरला निलंबित करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मागणीबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला महावितरणचे जिल्हा कार्यकारी अभियंता फुलपगारे, राजापूरचे अभियंता श्री. तांबोळी, श्री. पांडव यांच्यासह अभिजीत गुरव, माजी सभापती अभिजीत तेली, पेंडखळे सरपंच राजेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते संजय सरफरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिशय संवेदनशील विषयासंदर्भात बैठक असल्याने या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या फौजफाट्यासह उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button