मतमोजणीच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आठवडाभर दावोस दौऱ्यावर; विक्रमी परकीय गुंतवणूकीवर भर!


महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ‘जागतिक आर्थिक परिषदे’च्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दौऱ्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसला रवाना होणार आहेत. १७ ते २४ जानेवारी असा आठवडाभरा हा दौरा आहे. यंदा विक्रमी विदेशी गुंतवणुकीचे करार करण्याची योजना आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९ ते २३ जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील, राज्यांतील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्यांही सहभागी होणार आहेत. या दौऱ्यासाठी १७ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि सहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रवाना होईल. शासनाच्या निर्णयानुसार प्रवास, विविध दैनंदिन भत्ते, व्हिसा शुल्क, वैद्यकीय विमा आणि इतर सोयींसाठी आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उचलणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त नगरविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, सिडकोचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमआयडीसीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार तसेच मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यामागे औद्योगिक सामंजस्य करार, परकीय गुंतवणूक व रोजगार निर्मितीचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंदा २० लाख कोटींपेक्षा अधिक विदेशी गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button