
मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली-कोंडवी वाकणजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. मोहनेश चंद्रम बडगेर (वय ३२, रा. कर्नाटक) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील सर्व जखमी हे रस्त्याचे काम करणारे मजूर असून ते सध्या हरचेरी या ठिकाणी वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी हे सर्व कामगार मिनी बसने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पाली येथील बाजारपेठेत आले होते. खरेदी आटपून ही बस पुन्हा हरचेरीच्या दिशेने परतत असताना चिंद्रवली-कोंडवी येथील धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने ही बस थेट दरीत कोसळली.




