
सावधान! इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; जगभरातील १७ दशलक्ष इन्स्टाग्राम खात्यांची माहिती लीक.
अलीकडेच प्रसिद्ध आलेल्या एका सायबर-इंटेलिजन्स अहवालानुसार इंस्टाग्राम, फेसबूक संबंधित वापरकर्त्यांचा डेटा (महत्त्वपूर्ण माहिती) डार्क वेबवर प्रसारित केला जात आहे. जगभरातील १७ दशलक्ष इंस्टाग्राम खात्याची माहिती अशा पद्धतीने लीक झाली आहे, असे हा अहवाल म्हणतो.
याचा अर्थ १७ दशलक्ष वापरकर्त्यांच्या मेल आयडीवरून सायबर ठगांनी त्यांच्या बँकेच्या खात्यांची माहिती मिळवली आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या समाजमाध्यांच्या जगात प्रत्येकाचे इन्स्टाग्राम, फेसबूक, एक्स अशा विविध ठिकाणी खाते आहेत. त्यामुळे तुमचे खाते तर फिशिंगच्या जाळ्यात अडकले नाही ना… याची खात्री करा असा संदेश सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक खाते हॅक झाले आहे. परंतु उघड झालेल्या डेटाचा वापर अनेकदा फिशिंग, खाते ताब्यात घेण्याचे प्रयत्न, ओळख फसवणूक आणि सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांसाठी केला जात आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर सक्रीय असलेल्या प्रत्येकाच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.




