
ओळख महाभारताची. भाग १८. धनंजय चितळे
समारोप
समर्थ श्रीरामदासस्वामींनी दासबोधाच्या चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तीची चर्चा केली आहे. यामध्ये ते कीर्तनाची फलश्रुती सांगताना म्हणतात, ”कीर्तने महादोष जाती|” तसेच ते पुढे म्हणतात, ”प्राणिमात्र सुसील होती|”अर्थात भगवंतांचे कीर्तन करण्याने आणि कीर्तनश्रवणाने महादोष जातात आणि सर्वजण सदाचारणी होतात.
बरेच वेळा लोकांची अशी समजूत होते की ज्यांना काहीच करता येत नाही किंवा ज्यांचा घरी वेळ जात नाही, त्यांच्यासाठी कीर्तन व्यवस्था आहे. पण तसे नाही. खरे तर कीर्तने ही युवा पिढीने लक्षपूर्वक ऐकण्याची आवश्यकता आहे.
पूर्वीच्या काळी रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अशा सर्व गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरोघरी होते. शाळेमध्ये असे काही संस्कार केले जात होते. मला आठवते त्याप्रमाणे दर शनिवारी आम्ही आमचा वर्ग शेणाने सारवायचो आणि त्यानंतर वर्गातील मारुतीरायांच्या फोटोची पूजा करून नारळ वाढवला जायचा. भीमरूपी आणि मारुतीची आरती म्हटली जायची. त्यानंतर खोबऱ्याचा प्रसाद सर्व वर्गात वाटला जाई. आता असे चित्र दिसत नाही. त्यामुळेच की काय, आमच्या पुढच्या पिढ्यांना या ग्रंथांची ओळखच नाही. मध्यंतरी कोरोना काळात दूरदर्शनने रामायण महाभारत या गाजलेल्या मालिकांचे पुनर्प्रसारण केले. त्यामुळे काही लोकांनी तरी त्या मालिकांच्या माध्यमातून या कथांची ओळख करून घेतली.
वाचक हो, आजचा काळ वेगळा आहे, आज आपल्या संस्कृतीवर आघात करण्यासाठी विविध विचारसरणीचे लोक टपले आहेत. जे उघड विरोधक आहेत, त्यांच्याशी सामना करणे तुलनेने सोपे आहे, पण जे आपल्याच कथा विकृत करून आपल्यासमोर मांडतात आणि त्यातून सर्वसामान्य लोकांचा बुद्धिभेद करतात, त्या लोकांशी लढणे थोडे अवघड आहे. त्यासाठी सखोल अभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. हा अभ्यास करण्यासाठी गुगल किंवा व्हॉट्सअॅप उपयोगी पडणार नाही. AI सुद्धा निरुपयोगी आहे. तिथे मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत, या ग्रंथात नक्की काय दिले आहे, याची रूपरेषा जाणकाराकडून समजून घेतली पाहिजे.
रत्नागिरीकरांच्या सुदैवाने विद्यावाचस्पती हरिभक्तिपरायण चारुदत्तबुवा आफळे यांच्यासारखा सिद्धहस्त अभ्यासक मार्गदर्शनासाठी तत्पर आहे. कीर्तनसंध्या या संस्थेने समाजामध्ये सद्विचारांचा दीप लावण्याचा वसा घेतला आहे. आपण श्रोतेही या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत आहात. तो असाच टिकला पाहिजे . श्री.आफळेबुवांच्या पाच-सहा दिवसांच्या कीर्तनमालेतील विचार पुढचे तीनशे साठ दिवस कृतीत आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनी पोटतिडकीने सांगितलेली विचारसूत्रे आपल्या परिचितांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, ”सेवितो हा रस वाटितो आणिका” म्हणजे या कीर्तनाचा आनंद आपण तर घ्यायचाच आहे, पण तो अन्य लोकांबरोबर वाटायचाही आहे. श्री. आफळेबुवांची कीर्तने ऐकल्यानंतर आपल्या घरात आणि आपल्या परिसरात भारतीय संस्कृतीचे आग्रहपूर्वक पालन कसे होईल, याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षीची आणि या वर्षीची लेखमाला लिहिण्याची संधी मला मिळाली. त्यानिमित्ताने महाभारताचे थोडे पुनर्वाचन झाले. म्हणून मी या संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन लेखणीला विराम देतो.
जय योगेश्वर! भारत माता की जय.!!
(समाप्त)




