१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाच्या तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळ्यात अडकला


खरेदी केलेल्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई १ जानेवारी २०२६ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, सध्या रा. ओम शांती अपार्टमेंट, नाचणे, रत्नागिरी, मूळ रा. कोणेगांव, ता. कराड, जि. सातारा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या मिळकतीचा फेरफार होऊन सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी आणि नाव लागलेला सातबारा व फेरफारची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची १ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली असता, तलाठी चव्हाण याने लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने चाफे येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना तलाठी बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button