मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला


उत्तरेकडील शीत वारे पुन्हा राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा जाणवू लागला आहे. आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला असून, अनेक ठिकाणी थंडी दिवस अनुभवायला मिळत आहे. काल म्हणजेच रविवारी परभणी येथील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ५.८ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगरमध्ये ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर जेऊर आणि गोंदिया येथे तापमान ८ अंशाच्या खाली आहे. पुणे, जळगाव, ‎‎मालेगाव, ‎परभणी, अमरावती, ‎नागपूर, यवतमाळ येथे ९ अंशांपेक्षा कमी असून ‎‎नाशिक, भंडारा, ‎वर्धा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button