
माणगाव अपघातप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करा; जनआक्रोश समितीची पोलिसांकडे मागणी
माणगाव :
मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव येथे झालेल्या अलीकडील अपघातानंतर अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश समितीने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बोऱ्हाडे साहेब यांची भेट घेतली.
समितीने यावेळी गेल्या १७ वर्षांतील अपघातांचे आकडे समोर ठेवत सांगितले की, महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे आजपर्यंत ४५०० पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू, तर १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. “अनेक दुर्घटनांमध्ये रस्त्यावरील त्रुटी स्पष्ट असतानाही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही; प्रत्येकवेळी चालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले,” अशी नाराजी समितीने व्यक्त केली.
अपघातात शिवशाही बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक मत स्थानिक प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी नोंदवले असले, तरी महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अचानक दुपदरी रस्ता होणे, इशारा फलकांचा अभाव, धोकादायक ठिकाणांचा सूचना ही प्रशासकीय व ठेकेदारांची गंभीर चूक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत अधिकारी व ठेकेदार यांनाही जबाबदार धरणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली.
यावर बोऱ्हाडे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले. तसेच माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. या पाहणी अहवालाच्या आधारे NHAI व PWD यांसारख्या संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात झाल्यास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस स्थानिक माणगावकर, जनआक्रोश समितीचे सदस्य तसेच माणगावमधील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजघटक एकत्र आल्यास महामार्गावरील दुर्लक्षाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद होईल, असा विश्वास जन आक्रोष समितीने व्यक्त केला.




