
चिपळूणमध्ये महायुती आली, तर कोणत्याही प्रकल्पाला पैशांची कमतरता पडू देणार नाही,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
चिपळूणला महापुराच्या भयस्वप्नातून बाहेर काढून स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने नेण्याचा महत्त्वाकांक्षी मार्ग महायुती सरकारने आखला असून येत्या निवडणुकीत महायुतीचा नगराध्यक्ष झाल्यास चिपळूणसाठी कुठलाही विकासनिधी रोखला जाणार नाही, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी भरलेल्या महायुतीच्या भव्य सभेत त्यांनी हे आश्वासन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिले. पूरकाळातील त्यांची धावपळ, तत्काळ दिलेला तब्बल २ कोटींचा निधी, १६ ट्रक मदत साहित्य, वैद्यकीय पथके, यांची आठवण करून देत त्यांनी पुन्हा एकदा “चिपळूणकरांपाठी मी खंबीरपणे उभा आहे” अशी ग्वाही दिली. नगराध्यक्ष झाल्यावर उमेश सकपाळ ज्या ज्या कामासाठी निधी मागतील, त्या त्या कामाला मी ‘हो’ म्हणणार. मी देणारा उपमुख्यमंत्री आहे, घेणारा नाही. चिपळूणमध्ये महायुती आली, तर कोणत्याही प्रकल्पाला पैशांची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील खुल्या मैदानावर महायुतीतर्फे भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली. माजी मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या सभेला प्रचंड उत्साह लाभला. नगराध्यक्ष पदाचे महायुती उमेदवार उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या आवाहनावर ही सभा भरली होती आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावत या सभेला ऐतिहासिक प्रतिसाद दिला.
एकनाथ शिंदे हे दुपारी हेलिकॉप्टरने पवन तलाव मैदानावर उतरले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचे अभिवादन केले. व्यासपीठावर आल्यानंतर सौ. आरती सकपाळ यांनी त्यांचे औक्षण केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, चिपळूण शहराने २०२१च्या महापुरात अतोनात नुकसान सहन केले. त्या वेळी त्यांनी स्वतः चिपळूणमध्ये धाव घेऊन मदतकार्य उभे केले, १६ ट्रक अत्यावश्यक साहित्य पाठवले, विशेष वैद्यकीय पथक पाठवून साथीच्या आजारांना आळा घातला, तसेच शहराची साफसफाई करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मशीनरी आणली. “पंधरा दिवसांनी उठणारे शहर दोन दिवसांत स्वच्छ झाले, कारण आमच्याकडे काम करण्याची गती आणि इच्छाशक्ती आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शिंदे पुढे म्हणाले, “उमेश सकपाळ नगराध्यक्ष झाले, तर चिपळूणसाठी निधी कधीच कमी पडणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. लाडकी बहीण योजना, अनुदाने, पायाभूत सुविधा सगळं सुरूच राहील. चिपळूणला विकासाच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी महायुती पार पाडेल.” त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “काही लोकांनी पराभव मान्य केला आहे म्हणून ते सभा घेताना दिसत नाहीत, पण चिपळूणचे लोक विकासावर मतदान करतील, गोंधळावर नाही.”
सभेत पालकमंत्री उदय सामंत, उद्योगमंत्री, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेनेचे संपर्क नेते यशवंत जाधव, माजी आमदार विनय नातू, सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष रश्मीताई गोखले, शहराध्यक्ष प्राजक्ता टकले, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत, सांस्कृतिक केंद्राच्या नुतनीकरणाबाबत आणि शहरातील प्रलंबित कामांबाबत सकारात्मक भूमिकेचे आश्वासन दिले. महापुराच्या व कोरोना काळातील मदत कार्याची त्यांनी आठवण करून दिली आणि चिपळूणला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले. चिपळूण शहराला महापुराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी रेड लाईन–ब्ल्यू लाईनचा जो गंभीर प्रश्न आहे, त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
या सभेत उमेश धोंडीराम सकपाळ यांनी आपले दृष्टीकोनपत्र मांडले. त्यांनी कोरोना, पुराच्या वेळी केलेल्या मदतीची आठवण करून दिली आणि शहराच्या विकासासाठी काही ठोस मुद्दे मांडले. “चिपळूणला स्मार्ट सिटीच्या धर्तीवर उभारणार, प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार, ग्रॅव्हिटी पाणीयोजना तातडीने राबवणार, आधुनिक व सुसज्ज नगर परिषद इमारत उभी करणार,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “महापुरात मी लोकांसोबत होतो, घराघरात धान्य, अन्नसाहित्य, वैद्यकीय मदत पोहोचवली. कोरोनाच्या काळातही शहर सोडलं नाही. त्यामुळे चिपळूण मला ओळखतं,” असे उमेश सकपाळ यांनी भाषणात स्पष्ट केले.
सभेत भाजप नेते प्रशांत यादव यांनी ट्रक, आणि साफसफाई यंत्रणा, याची सर्वांना आठवण करून देत “चिपळूणच्या नागरिकांनी उमेश सकपाळ यांना मोठा विजय द्यावा,” असे आवाहन करण्यात आले. महायुतीचे उमेदवार योग्य प्रकारे काम करतील. पक्षाकडून त्यांच्याकडून काम करून घेतले जाईल, अशी ग्वाही दिली. महापुराच्या काळात उमेश सकपाळ यांनी मोठं काम केलं. वीस फूट खोल पाण्यात उतरून दोन कुटुंबांचा जीव वाचवला. एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शहर पुराखाली असताना ते स्वच्छ करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी तातडीने दिला. ठाणे, मुंबई, पनवेल येथून मशनरी मागवली. अधिकारी आणले आणि शहराला दोन दिवसातच स्वच्छ केले. व्हिजन असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमच्यासमोर आहे, असेही त्यांनी सांगितले.
सभेच्या सुरुवातीला महायुतीचे उमेदवार शशिकांत मोदी, रिपब्लिकन पार्टीचे उमेश सकपाळ आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष रश्मीताई गोखले यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे, तालुकाध्यक्ष बापू आहिरे, राकेश शिंदे, शशिकांत चव्हाण, तसेच विविध समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




